आंदोलने

दि. 1/11/2011 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिल्लीगेटयेथे रस्ता रोको आंदोलन घेण्यात आले
दिल्लीगेट रस्त्याची दुर्दशा व अवस्था खूपच बिकट झाल्यामुळे दिवसभर वाहतुकीने उडणारी धुळीला कंटाळून  येथील गाळे धारकांनी मनसे ला साथ देऊन महापालिके विरूढ आंदोलन पुकारले. तसेच या आंदोलनाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.
  
 
 


मनसेच्या तिघांना अटक, सुटका


 अहमदनगर। दि. ४ (प्रतिनिधी)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आज मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळसह तिघांना अटक केली. अटकेतील या तिघांचीही न्यायालयातून अटीवर सुटकाही झाली.
जिल्हा संघटक सचिन डफळ, महिला आघाडीच्या अँड. अनिता दिघे, नितीन भूतारे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यापूर्वी मनसेच्या चौघांना तर राष्ट्रवादीच्या सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज अटक झालेल्या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर त्यांच्या जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला.
न्यायालयाने प्रत्येक सोमवार व मंगळवारी भिंगार पोलीस ठाण्यात हजेरी या अटींवर १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पोलिसांनी नेहमीचे कारण देत पोलीस कोठडीची मागणी केली होती.

 
कारवाई थांवबा; अन्यथा परवाने द्या
(12-07-2013 )   
अहमदनगर: शहरातील विना परवाना धावणार्‍या रिक्षा चालकांनी आपणास परवाने मिळावेत तसेच रिक्षांवर होत असलेली कारवाई थांबावी या मागणीसाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व वसंत लोढा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक सचिन डफळ, कैलास गिरवले, नगरसेवक किशोर डागवाले,सतीश मैड आदींनी केले.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटल्याप्रमाणे शासनाने १९९६ पासून रिक्षांना परमीट देणे बंद केले आहे. परवाना मिळण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे,तरीही प्रशासन परवाना देत नाही. हे परवाने मिळत नाहीत तोपर्यंत जनहिताच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपाचा मॅक्सी कॅब अंतर्गत परवाना मिळावा. तसेच परवाने न देता अँपे रिक्षांवर आरटीओ कार्यालय कारवाई करते. परवाना देण्याऐवजी रिक्षा चालकांचे संसार उद्धवस्त करण्याचे काम सुरू आहे. यामुळे रिक्षा चालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शाळा नुकत्याच उघडल्या असून रिक्षाचालकांवरील कारवाईमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने त्याचा विचार करणे गरजेचे आहे
प्रशासनाने यासाठी तात्पुरते परवाने देऊन रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवावी असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर रिक्षा चालक संदीप जाधव, अशोक पावले, शंकर गोरे, निलेश वेल्हाळ,राहुल साळी, कैलास शेळके, संतोष चोथे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)



मनसेने लावून दिली सेना-राष्ट्रवादीची कुस्ती

प्रतिनिधी | May 16, 2013,
मनसेने लावून दिली सेना-राष्ट्रवादीची कुस्ती
नगर - सीना नदीपात्राचे सुशोभीकरण रखडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी महापालिका कार्यालयाच्या आवारात शिवसेना व राष्ट्रवादीची प्रतीकात्मक कुस्ती स्पर्धा भरवून अनोखे आंदोलन करण्यात आले. येत्या 21 मेपासून सुशोभीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ, शहराध्यक्ष सतीश मैड, वसंत लोढा, नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले, नितीन भुतारे, वैभव सुरवसे, मनोज राऊत आंदोलनात सहभागी झाले होते. सीनापात्र सुशोभीकरणासाठी शासनाकडून दीड कोटी मिळूनही दोन वर्षांपासून हे काम रखडले आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी महापौर संग्राम जगताप यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांकडून या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला. परंतु या कामाचे र्शेय राष्ट्रवादीला जाईल म्हणून आमदार अनिल राठोड यांनी हे काम बंद पाडले, असा आरोप आंदोलकांनी केला. राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष म्हणजे बिनकामाचे पैलवान आहेत. कामे न करताच र्शेय घेण्यासाठी त्यांच्यात राजकीय कुस्त्या सुरू असल्याचा आरोप करत आंदोलकांनी मनपा कार्यालयाच्या आवारात दोन्ही पक्षांच्या प्रतीकात्मक कुस्त्यांची स्पर्धा भरवली.

येत्या आठ दिवसांत सुशोभीकरणाचे काम सुरू न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. येत्या 21 मेपासून हे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



मनसेकडून टोलनाक्यांवर वाहनांची मोजणी

प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्ह्य़ातील सर्व म्हणजे नऊ टोल नाक्यांवर आजपासून वाहनांची मोजदाद सुरू केली. आगामी पंधरा दिवस अहोरात्र ही गणना करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर-औरंगाबाद मार्गावर या उपक्रमेाला प्रारंभ झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी ७ वाजताच जिल्ह्य़ातील टोल नाक्यांवर वाहनांची मोजदाद सुरू केली.
जेऊरसह सुपे (नगर-पुणे रस्ता), सारोळा बद्दी, खर्डा (दोन्ही जामखेड), देहरे (नगर-मनमाड), कोपरगावचे दोन, वडगावपान (नगर-संगमनेर), वाळूंज आणि मिरजगाव (नगर-सोलापूर) या ठिकाणच्या टोलनाक्यांवर वाहनांची मोजदाद सुरू करण्यात आली.
डफळ यांनी सांगितले की, पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिकडेच राज्यातील टोलनाक्यांवरील गैरव्यवहारांसंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, राज्य सरकारला या विषयाचे गांभीर्य नसल्याने आता आंदोलन हाती घेण्यात आले आहे. मागच्याच आठवडय़ात पक्षाने जिल्ह्य़ात टोल बंद आंदोलन केले. आता राज्यमार्गावरील टोलनाक्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची नोंद व तत्संबंधीचा तपशील गोळा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील या सर्व नाक्यांवर त्या, त्या ठिकाणचे पक्षाचे कार्यकर्ते येत्या पंधरा दिवसांत तळ ठोकून बसतील. येथे जागता पहारा देऊन हा तपशील गोळा करतील. ही सर्व माहिती पक्षाच्या वरिष्ठ कार्यालयाला, तसेच संबंधित कार्यालयाला पाठवण्यात येणार असून यातील सर्व बारकावे आम्ही उघड करू, असा विश्वास डफळ यांनी व्यक्त केला.
नगर-औरंगाबाद मार्गावर जेऊर येथे आज सुरू झालेल्या या आंदोलनाच्या वेळी शहराध्यक्ष सतिश मैड, गजेंद्र राशीनकर, रमेश सानप, अभिषेक मोरे, वैभव सुरवसे, निलेश भुतारे, सुमित डफळ, अनिता दिघे, वंदना थोरवे आदी सहभागी झाले होते.



शहर बससेवेसाठी मनसेचा घंटानाद
नगर, २९ जून/प्रतिनिधी
 
गेल्या २ वर्षांपासून बंद असलेली शहर बससेवा सुरू करावी, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिका कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत सहभागी असूनही मनसेने हे आंदोलन केले.
‘सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला आमचा पाठिंबा आहे असे नाही,’ असे याबाबत बोलताना नगरसेवक किशोर डागवाले यांनी सांगितले. मनपातील गटनेते गणेश भोसले, माजी नगरसेवक कैलास गिरवले, सतीश मैड, जिल्हा संघटक सचिन डफळ, महिला संघटक अनिता दिघे व अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. शहर बससेवा सुरू करा नाही, तर जनतेच्या पैशातून चारचाकी वाहनांमधून फिरणे बंद करा अशी मागणी या वेळी करण्यात आलीच, शिवाय याची दखल न घेतल्यास पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मनपाच्या वाहनांतून फिरणे मुश्किल करू, असा इशाराही देण्यात आला.
शहर बससेवेशिवाय शहरातील सर्व बंद सिग्नलही तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली. मनसेचे हे आंदोलन सुरू झाले, त्या वेळी मनपा कार्यालयात उपायुक्त डॉ. पंकज जावळे हेच फक्त उपस्थित होते. डागवाले, भोसले, गिरवले यांनी आयुक्त कल्याण केळकर यांच्याशीच बोलण्याचा आग्रह धरला. ते कौटुंबिक कामासाठी नागपूरला गेले असल्याचे व दुसरे उपायुक्त अच्युत हांगे कार्यालयीन कामासाठी मुंबईत असल्याची माहिती डॉ. जावळे यांनी त्यांना दिली.

त्यामुळे जावळे यांच्याशीच आंदोलकांची चर्चा झाली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच शहर बससेवा बंद पडल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ठेकेदाराने रिक्षा व्यावसायिकांपासून संरक्षण मागितले होते. ते दिले नाही. त्याच्या हिशेबावर लक्ष ठेवले गेले नाही. शहरातील हजारो विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्या सोयीची ही सुविधा बंद असताना मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मनपाच्या वाहनांतून जनतेच्या पैशाने फिरण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका गिरवले, डागवाले यांनी घेतली.
ही सेवा त्या सेवेतील कामगारांना चालवण्यास द्यावी, मनपा कामगार युनियनला द्यावी किंवा स्वत मनपानेच परिवहन समितीची स्थापना करून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवावी, असे ३ पर्याय मनसेने दिले. या तिन्ही पर्यायांवर मनपा पदाधिकारी, अधिकारी व मनसेचे पदाधिकारी अशी संयुक्त बैठक लवकरच घेण्याचे लेखी आश्वासन डॉ. जावळे यांनी मनसेला दिले. सिग्नलची निविदा मंजूर झाली असून, संबंधित संस्थेला कार्यारंभ आदेशही दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
आंदोलनात सर्वश्री. अक्षय राशीनकर, सागर गोरे, राजू मंगलारप, मनोज राऊत, हसन शेख, डॉ. समर रणसिंग, डॉ. महेश वीर, राजेंद्र आरडे, बजरंग वाकळे आदी सहभागी झाले होते.





No comments:

Post a Comment